पुणे: वारकरी संप्रदायाबाबत कथित चिथावणीखोर वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुण्यातील वाघोली पोलीस ठाण्यात 8 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. लवांडे यांच्या ताब्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत ही कारवाई लोकशाहीविरोधी असल्याचा आरोप केला आहे.

शशिकांत शिंदे यांनी पोलिस कारवाईवर प्रश्न उपस्थित करत, नागरिकांना आपले मत मांडण्याचा अधिकार कमी होत चालल्याची टीका केली. तसेच पोलिस यंत्रणा सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. लवांडे यांच्यावर शाईफेक करणाऱ्यांवर तातडीने कारवाई झाली नाही, मात्र त्यांच्याविरोधात पोलिसांनी तत्परता दाखवली, असा दावा त्यांनी केला.
विकास लवांडे हे संघर्ष करणारे कार्यकर्ते असून ते दडपशाहीला घाबरणारे नाहीत, असेही शिंदे म्हणाले. अन्याय आणि हुकूमशाही दीर्घकाळ टिकत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. या पार्श्वभूमीवर ते स्वतः आणि आमदार रोहित पवार यांनी वाघोली पोलीस ठाण्यात भेट दिल्याचेही त्यांनी सांगितले.
या प्रकरणाची सुरुवात एका व्हिडिओमुळे झाली. सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये वारकरी संप्रदायाबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप लवांडे यांच्यावर करण्यात आला. त्यानंतर एका महिलेने वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या गुन्ह्याच्या अनुषंगाने विकास लवांडे यांनी न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. सध्या या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.







