न्हावरे: केडगाव येथील बेकायदेशीर गर्भलिंग निदान व स्त्री भ्रूणहत्या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या रॅकेटचे धक्कादायक धागेदोरे समोर येत आहेत. या प्रकरणात अटकेत असलेला डॉ.सुमंत शितोळे याच्या पारगाव (ता. दौंड) येथील मंगलमूर्ती हॉस्पिटलमधील सोनोग्राफी सेंटरला आरोग्य विभागाने मंगळवारी सील ठोकले असून, या कारवाईमुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गुजर यांनी या कारवाईची पुष्टी केली.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, या रॅकेटमधील मुख्य आरोपी अण्णा गिरी हा गर्भलिंग निदान केल्यानंतर संबंधित गर्भवती महिलांना स्त्री भ्रूणाचा गर्भपात करण्यासाठी डॉ. शितोळे याच्या रुग्णालयात पाठवत असल्याचा गंभीर आरोप आहे. पोलिसांनी डॉ.शितोळे याला ताब्यात घेऊन पारगाव येथे नेऊन रुग्णालयाची झाडाझडती घेतली. दरम्यान,संबंधित लवंगरे हॉस्पिटलचा गर्भतपासणी परवानाही रद्द करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपी डॉ. सुमंत शितोळे व बापू जांबले यांची पोलिस कोठडी बुधवारी (दि.१) संपत असून, अन्य आरोपी सदिच्छा शिंदे व सचिन कदम यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. चालक अमित टेंगले सध्या पोलिस कोठडीत आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे शिरूर, हवेली आणि बारामती तालुक्यातील काही डॉक्टरांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली असल्याची चर्चा आहे. गर्भतपासणीसाठी डॉ. शितोळे याच्याकडे महिला रुग्णांना नेमके कोण रेफर करत होते. याबाबत विविध स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. तसेच डॉ. शितोळे काही ठिकाणी जाऊन मोबाईल स्वरूपात सोनोग्राफी सेवा देत असल्याच्याही चर्चा सुरू असून, या बाबींची अधिकृत तपासातून पडताळणी होणे बाकी आहे.
या संपूर्ण प्रकरणात एकूण आरोपींची संख्या आता २४ वर पोहोचली आहे. त्यामध्ये ८ डॉक्टर,३ मेडिकल चालक,एक वैद्यकीय साहित्य पुरवठादार तसेच एजंट आणि मध्यस्थांचा समावेश असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. गर्भलिंग निदानाचे हे जाळे अहिल्यानगर, नाशिक आणि पुणे या तीन जिल्ह्यांपर्यंत विस्तारल्याचे तपासातून समोर आले आहे.
विशेष म्हणजे, शिरूर तालुक्यातील न्हावरे,शिरूर आणि इतर मोठ्या गावांमध्ये एजंटमार्फत गर्भलिंग निदान चाचण्या होत असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही या बेकायदेशीर रॅकेटची मुळे किती खोलवर रुजली आहेत. याची गंभीर बाब समोर आली आहे. तपासादरम्यान यंत्रणांनी गर्भलिंग निदानासाठी वापरली जाणारी ६ सोनोग्राफी मशीन, चार चारचाकी वाहने आणि एक दुचाकी जप्त केली आहे. या कारवाईमुळे रॅकेटची व्याप्ती मोठी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणात शिरूर येथील डॉ. ज्ञानेश्वर नायकोडी यालाही अटक करण्यात आल्याने शिरूर तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातही मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे.कोणत्या रुग्णालयांपर्यंत या साखळीचे धागे पोहोचले आहेत आणि रेफरलचे आर्थिक व्यवहार कसे होत होते, याचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे.
दरम्यान, तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतसे गर्भलिंग निदानाच्या बेकायदेशीर व्यवसायामागील आर्थिक साखळी, एजंटांचे जाळे आणि वैद्यकीय क्षेत्रातील संभाव्य संगनमत उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.







