पुणे: पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक संदीप कदम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शिरोळे रोडवरील एका कॅफेमध्ये ग्राहक आणि कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा कथित प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, 6 जून रोजी संदीप कदम हे रात्रपाळीचे कर्तव्य बजावत होते. रात्री सुमारे 1.45 वाजण्याच्या सुमारास ते शिरोळे रोडवरील ‘फ्लाइंग जिप्सी’ कॅफेमध्ये गेले. त्यावेळी कॅफे बंद करण्याची तयारी सुरू होती.

यावेळी कदम यांनी हातातील काठीने काउंटरवरील कॉफीचे ग्लास आणि इतर खाद्यपदार्थ खाली पाडल्याचा आरोप आहे. तसेच कॅफेमध्ये बसलेल्या ग्राहकांना तातडीने बाहेर जाण्यास सांगत कर्मचाऱ्यांशी अरेरावीची भाषा वापरल्याचेही समोर आले आहे.
हा संपूर्ण प्रकार कॅफेमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या प्रकारामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाल्याचे नमूद करत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संदीप कदम यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
प्राथमिक चौकशीत त्यांचे वर्तन बेजबाबदार, पोलिस दलाच्या शिस्तीला बाधा आणणारे आणि खात्याला अशोभनीय असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.







