पुणे : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर परिसरात (Shirur News) पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीची झोपेत असताना धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. (Pune Crime)

मृत व्यक्तीचे नाव बाळासाहेब बबन तांबे (रा. रानमळा वस्ती, वरुडे, ता. शिरूर) असे आहे. 8 जून रोजी पहाटे सुमारे 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी बाळासाहेब तांबे हे आपल्या घराबाहेर आईसोबत झोपलेले होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, अंधाराचा फायदा घेत आरोपीने तांबे यांच्या गळ्यावर धारदार कोयत्याने वार केले. हल्ला इतका गंभीर होता की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी प्रकाश बबन तांबे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. चौकशीदरम्यान गावातील एका अल्पवयीन मुलावर संशय व्यक्त करण्यात आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्राथमिक तपासात मृत बाळासाहेब तांबे आणि आरोपी अल्पवयीन मुलामध्ये यापूर्वी वाद झाल्याचे समोर आले आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या वादानंतर काही दिवसांपूर्वीही त्यांच्यात पुन्हा वाद झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याच रागातून ही हत्या करण्यात आल्याचा संशय आहे.
तपासादरम्यान आरोपीने गुन्ह्यात वापरलेला कोयता लपवून ठेवल्याचे उघड झाले. पोलिसांनी तो कोयता जप्त केला असून त्यावरील पुराव्यांची तपासणी सुरू आहे.
दरम्यान, आरोपी अल्पवयीन मुलगा सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि धमकीवजा संदेश प्रसारित करत असल्याची माहितीही समोर आली आहे. या अनुषंगाने त्याच्या सोशल मीडिया खात्यांची तपासणी करण्यात येत असून त्यातील माहितीचा तपासात समावेश केला जात आहे.
या प्रकरणाचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि प्रभारी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि त्यांचे पथक पुढील तपास करत आहे.







