पुणे: पुणे शहरात किरकोळ वादातून हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच, खराडी परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रात्रीच्या वेळी ‘आधी कोणी झोपायचे?’ या साध्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर खुनात झाले. या घटनेत 52 वर्षीय पांडुरंग भाऊराव हरवणे या सुरक्षारक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, गुन्हा केल्यानंतर स्वतः आरोपीनेच पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून या कृत्याची कबुली दिली.

खराडीतील स्वीट इंडिया चौकाजवळील ‘स्पॅनोलाइफ’ सोसायटीत ही घटना सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास घडली. पांडुरंग हरवणे आणि 22 वर्षीय सुदर्शन काळे हे दोघेही याच ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून तैनात होते. रात्रपाळीच्या वेळी दोघांनी 3-3 तास झोपण्याचे ठरवले होते. मात्र, त्या दिवशी आधी कोणी विश्रांती घ्यायची, यावरून त्यांच्यात वाद झाला होता. रागाच्या भरात सुदर्शनने पांडुरंग यांचा गमछाने गळा आवळला, ज्यामुळे ते जागीच बेशुद्ध पडले आणि त्यांचा मृत्यू झाला.
सध्या पांडुरंग यांचा मुलगा बाळू हरवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोटे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.







