बारामती: बारामती एमआयडीसी परिसरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटनांचा पोलिसांनी यशस्वी उलगडा केला आहे. या कारवाईत अल्पवयीन मुलांकडून चोरीचा माल खरेदी करणाऱ्या भंगार व्यावसायिकासह काही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पहिल्या घटनेत 13 मार्च रोजी डायनामिक्स कंपनीच्या परिसरातून सोलर प्लांटला जोडलेली सुमारे 15000 रुपये किमतीची कॉपर केबल चोरीला गेली होती. याबाबत 16 मार्च रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली.
या मुलांनी चोरीचा माल भंगार व्यावसायिक मोहम्मद शब्बीर मोहम्मद बशीर अन्सारी (वय 38) याला विकल्याचे समोर आले. पोलिसांनी अन्सारी याला अटक करून त्याच्याकडून 13 किलो तांब्याची तार जप्त केली. अल्पवयीन मुलांना बाल न्याय मंडळासमोर हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेत 3 मार्च रोजी हिरकणी रियल इस्टेट प्रा. लि. यांच्या गोदामातून सुमारे 6,05,000 रुपये किमतीचा माल चोरीस गेला होता. यामध्ये इलेक्ट्रिकल केबल, पाण्याचे फिटिंग साहित्य, आरओ आणि तांब्याच्या तारा तसेच ट्रान्सफॉर्मर ऑईलचा समावेश आहे.
या प्रकरणी मच्छिंद्र प्रदीप गव्हाळे, राजू रामा दिवटे, संजय रामा दिवटे आणि सनी भारत पाथरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी राजू रामा दिवटे आणि संजय रामा दिवटे यांना 5 मार्च रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या प्रकरणात चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम सुरू आहे.
दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास पोलीस हवालदार किशोर वीर आणि राहुल मखरे हे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, किशोर वीर, राहुल मखरे, जितेंद्र शिंदे, मनोज पवार, राहुल लांडगे, सचिन तरंगे आणि आफरीन शेख यांनी या कारवाईत सहभाग घेतला.







