अहिल्यानगर: श्रीरामपूर येथे काँग्रेसच्या अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर (Sachin Gujar Kidnapping) यांच्या अपहरणाची धक्कादायक (Shrirampur News) घटना घडली आहे. सकाळी (Ahilyanagar News) मॉर्निंग वॉक करून घरी परतत असताना काही जणांनी त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवले. कारमध्ये बसताच त्यातील एका व्यक्तीने त्यांच्या डोक्याला पिस्तूल लावले. त्यांच्यावर तीन वेळा पिस्तूल रोखण्यात आले आणि भर रस्त्यात त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच त्यांना विवस्त्र करून अपमानित करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

अपहरणकर्त्याचा धक्कादायक खुलासा
ही घटना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडल्यामुळे या घटनेच्या चर्चांना उधाण आलं आहे. या अपहरणाबाबत चंदू आगे नावाच्या संशयिताने एका व्हिडिओमध्ये सांगितलं की, छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने त्याने सचिन गुजर यांना धडा शिकवण्यासाठी हा प्रकार केला. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या चंदू आगेने हा दावा केला आहे.
‘तुला जास्त माज आला का?’ म्हणत अपहरण
सचिन गुजर यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते सकाळी चालून घरी येत असताना मागून एक कार आली. त्यातून चंदू आगे आणि दुसरा एक साथीदार उतरला. त्यांनी तुम्ही आमच्या साहेबांविरुद्ध बोलता, तुला जास्त माज आला आहे असे म्हणत त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवले. कारच्या मागच्या सीटवर त्यांना बसवण्यात आले आणि तिथे आधीच बसलेल्या तिसऱ्या व्यक्तीने त्यांच्या कानाजवळ पिस्तूल ठेवले. पुढे कार मळीच्या ओढ्याजवळ एक निर्मनुष्य रस्त्यावर नेण्यात आली.
घटनास्थळावरून आरोपी फरार
तिथे कार थांबवून सहा जणांनी त्यांना मारहाण केली. या वेळी त्यांचे कपडे काढून त्यांना रस्त्यावर बसवण्यात आले आणि पुन्हा मारहाण करण्यात आली. त्याच वेळी त्यांचे चित्रीकरणही करण्यात आले. त्यांच्या मोबाईलचीही तोडफोड करण्यात आली. त्यानंतर आसपास लोक येताना दिसल्याने आरोपी वाहनांसह पळून गेले. घटनास्थळावरून जात असलेल्या एका महिलेच्या मोबाईलवरून त्यांनी पत्नीला माहिती दिली. नंतर पुतण्या प्रताप गुजर यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.







