पुणे: ऑटोरिक्षा चालक आणि मालकांसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने महत्त्वाचा बदल केला आहे. पुणे आरटीओच्या कार्यक्षेत्रातील काही ठिकाणी सुरू असलेली मीटर तपासणीची सुविधा आता बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी दोन नवीन ठिकाणी ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. कमी प्रतिसाद मिळत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे यांच्या मान्यतेनुसार पिंपरी-चिंचवड आणि बारामती कार्यक्षेत्रातील ऑटोरिक्षांसाठी 1 सप्टेंबर 2026 पासून सुधारित भाडेदर लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार रिक्षांचे मीटर योग्य पद्धतीने सुरू आहेत की नाही, याची तपासणी करण्यासाठी आरटीओकडून विविध ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती.
मात्र, खराडी येथील ईऑन आयटी पार्कजवळील खराडी पोलीस चौकीसमोर आणि शिवाजीनगरमधील सिंचननगर, रेंजहिल्स कॉर्नर येथे चालकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या दोन्ही ठिकाणची मीटर तपासणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे कर्वेनगरमधील अलंकार पोलीस स्टेशनसमोर आणि रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेटमधील इगल्बर्ग कंपनी, लेन क्रमांक 3 येथे मीटर तपासणीची सुविधा सुरू राहणार आहे.

या दोन्ही केंद्रांवर सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 ते 10 या वेळेत, तर शनिवारी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत तपासणी केली जाईल. त्यामुळे रिक्षाचालकांनी बंद झालेल्या जुन्या केंद्रांवर जाण्याऐवजी नव्या ठिकाणी मीटर तपासणीसाठी जावे.

मीटर कॅलिब्रेशन पूर्ण झालेल्या रिक्षा तपासणीसाठी संबंधित केंद्रांवर आणाव्यात, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी केले आहे.







