विशाल शिंदे

कोंढणपुर : हवेली तालुक्यातील कोंढणपुर येथे जमिनीच्या व्यवहारातून वाद निर्माण होऊन शेतकरी आणि त्यांच्या भाच्याला दगडफेक करून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. जमिनीच्या मालकी आणि आर्थिक व्यवहारावरून झालेल्या वादातून तिघांनी शिवीगाळ व दमदाटी करत दगड फेकून मारल्याचा आरोप आहे. या घटनेत फिर्यादी शेतकरी आणि त्यांच्या भाच्याला दुखापत झाली असून याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिताराम परशुराम मुजुमले (वय ४२, व्यवसाय शेती, रा. कोंढणपुर, ता. हवेली, जि. पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कोंढणपुर येथील गट क्रमांक ४६० मध्ये त्यांच्या वाट्याला आलेल्या दीड एकर जमिनीपैकी एक एकर जमीन त्यांनी २०२२ मध्ये तानाजी पांडुरंग बेलदरे यांना स्वखुशीने खरेदीखत करून दिली होती. मात्र, संबंधित जमिनीच्या व्यवहारातील आर्थिक देवाणघेवाण आजपर्यंत पूर्ण झाली नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याच आर्थिक व्यवहारावरून ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास कोंढणपुर येथील गट क्रमांक ४६० मधील जमिनीवर वाद निर्माण झाला. यावेळी तानाजी पांडुरंग बेलदरे, त्यांची पत्नी कविता तानाजी बेलदरे आणि मुलगा मनिष तानाजी बेलदरे हे तिघे तेथे आले. त्यांनी फिर्यादी सिताराम मुजुमले आणि त्यांचे भाचे किरण चोरघे यांना उद्देशून अपमानास्पद भाषा वापरत शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप आहे.

वादाचे रूपांतर पुढे मारहाणीत झाले. आरोपींनी जमिनीमध्ये पडलेले दगड उचलून फिर्यादी मुजुमले यांच्या उजव्या हातावर, पाठीवर आणि मांडीवर फेकून मारले. तसेच त्यांचे भाचे किरण चोरघे यांच्या उजव्या बाजूच्या बरगडीवरही दगड फेकून मारल्याने दोघांना दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी सिताराम परशुराम मुजुमले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तानाजी पांडुरंग बेलदरे, कविता तानाजी बेलदरे आणि मनिष तानाजी बेलदरे (सर्व रा. आंबेगाव बुद्रुक, ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागे, घर क्रमांक ४८, ता. हवेली, जि. पुणे) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२५(अ), ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याची नोंद ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजून ४९ मिनिटांनी राजगड पोलीस ठाण्यात करण्यात आली. पुढील तपास पोलीस अंमलदार काळे करीत आहेत.
जमिनीच्या आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेला वाद थेट दगडफेकीपर्यंत पोहोचल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. जमिनीच्या व्यवहारातील नेमका वाद काय होता आणि घटनेमागील इतर कारणे कोणती, याचा पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.







