यवत, ता. 4 : दोन जणांमध्ये सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या नातेवाइकावर संतापलेल्या तरुणाने बिअरच्या काचेच्या बाटलीने डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. तसेच मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या जखमीच्या भावालाही बाटलीने मारहाण केल्याची घटना दौंड तालुक्यातील एकेरीवाडी येथील राज ढाब्यासमोर घडली. या प्रकरणी गणेश अनिल अडागळे (रा. एकेरीवाडी, ता. दौंड) याच्याविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील दगडू पवळे (वय 37, रा. गलांडवाडी, ता. दौंड) हे मोलमजुरी करतात. मंगळवारी (ता. ३) दुपारी तीनच्या सुमारास ते कामानिमित्त एकेरीवाडी येथे गेले होते. त्यावेळी राज ढाब्यासमोर गणेश अनिल अडागळे आणि अजिंक्य चव्हाण यांच्यात भांडण सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
दोघांमधील वाद मिटविण्यासाठी पवळे यांनी मध्यस्थी करत भांडण करू नका, असे समजावून सांगितले. मात्र, याचा राग आल्याने गणेश अडागळे याने पवळे यांना शिवीगाळ व दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर तेथे पडलेली हिरव्या रंगाची बिअरची काचेची बाटली उचलून त्यांच्या डोक्यात मारली. यामध्ये पवळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पवळे यांचा मुलगा विशाल आणि भाऊ विनोद हे घटनास्थळी आले. विनोद पवळे हे सुनील यांना आरोपीच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न करत असताना गणेश अडागळे याने त्यांनाही बिअरच्या काचेच्या बाटलीने मारहाण केली. जखमी सुनील आणि विनोद यांना उपचारासाठी यवत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या प्रकरणी सुनील पवळे यांच्या फिर्यादीवरून यवत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.







