Pune Train : उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. पुणे विभागातून गाझीपूर सिटीसाठी विशेष द्विसाप्ताहिक रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. 1 मेपासून पुणे-गाझीपूर सिटी-हडपसर विशेष रेल्वे धावणार असून, त्यामुळे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 01431 ही पुणे-गाझीपूर सिटी विशेष रेल्वे 1 मे ते 14 जुलैदरम्यान चालवली जाणार आहे. ही रेल्वे दर मंगळवारी आणि शुक्रवारी पुणे स्थानकातून सकाळी 6.40 वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7.05 वाजता ती गाझीपूर सिटी येथे पोहोचेल.
तर गाडी क्रमांक 01432 ही गाझीपूर सिटी-हडपसर विशेष रेल्वे 3 मे ते 16 जुलैदरम्यान धावणार आहे. ही रेल्वे दर गुरुवारी आणि रविवारी गाझीपूर सिटी येथून पहाटे 4.20 वाजता सुटेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हडपसर स्थानकात पोहोचेल. विशेष म्हणजे, पुण्यातून सुटणारी ही रेल्वे परतीच्या प्रवासात थेट हडपसरपर्यंत जाणार आहे.
या विशेष रेल्वेच्या एकूण 44 फेऱ्या होणार आहेत. उन्हाळी सुट्टीत गावी जाणारे, सहलीसाठी निघालेले तसेच उत्तर प्रदेशकडे जाणारे प्रवासी यांना याचा मोठा फायदा होणार आहे. पुणे आणि परिसरातील अनेक प्रवासी दरवर्षी या काळात उत्तर भारताकडे जात असल्याने रेल्वेने ही अतिरिक्त सेवा उपलब्ध करून दिली आहे.
पुणेहून सुटणाऱ्या या विशेष रेल्वेला दौंड, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, कटनी, सतना, प्रयागराज आणि वाराणसी येथे थांबा असेल. त्यानंतर गाझीपूर सिटी हा अंतिम थांबा असेल.







