Pune Suicide News: बार्शी, ता. 26 : बार्शी, ता. 26 : शहरातील गाडेगाव रोड, म्हाडा कॉलनी येथे राहणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. या प्रकारामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून, मृत ग्रामसेवकाच्या कुटुंबीयांनी न्यायासाठी पोलिसांत धाव घेतली आहे. मात्र, पोलिसांनी “गुन्हा तात्काळ दाखल करता येत नाही” असे सांगत कुटुंबीयांना रितसर जबाब नोंदवण्याचे सांगितले. त्यामुळे बार्शी ग्रामीण रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्रकाश बावीस्कर (वय-49) असे आत्महत्या केलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश बावीस्कर यांची बार्शीतून बदली होऊन सध्या अंबड (ता. माढा) येथे कार्यरत होते. बुधवारी (ता. 19) रोजी दुपारी अडीचच्या सुमरास प्रकाश बावीस्कर यांनी राहत्या घरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पत्नी, मुलगी घरी असताना पती घराच्या दुसऱ्या खोलीमध्ये होते. त्यावेळी पत्नीला एकदम खुर्ची पडल्याचा आवाज येताच पत्नीने खोलीत जाऊन पाहिले त्यावेळी रुमच्या पंख्याला पतीने दोरीने गळफास घेतल्याचे दिसले त्वरीत उचलुन धरले आणि आरडा-ओरड केली. त्यावेळी मुलगी आणि शेजाऱ्यांनी खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले. काही दिवस उपचार सुरू असताना 26 नोव्हेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.
प्रकाश बाविस्कर यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. “जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,” असा ठाम पवित्रा घेतल्याने रुग्णालयात मोठी गर्दी झाली. कुटुंबीय रुग्णालयात ठिय्या देऊन बसले असून पोलिस त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी “सध्या गुन्हा दाखल करता येणार नाही, प्रथम कुटुंबीयांचा जबाब नोंदवावा लागेल,” असे सांगितले. मात्र, कुटुंबीय मात्र गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर ठाम राहिले आहेत.
दरम्यान, प्रकाश बाविस्कर यांचे पार्थिव पोस्टमार्टेमसाठी रुग्णालयात नेण्यात आले. पण पोस्टमार्टेम करण्यापूर्वीही कुटुंबीयांना कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे त्यांच्या संतापात आणखी भर पडली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे बार्शी ग्रामीण रुग्णालयात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, कुटुंबीयांचा ठाम पवित्रा पाहता प्रशासन आणि पोलिसांवर दबाव वाढला आहे. प्रकाश बावीस्कर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.






