पुणे: राज्यातील महापालिका (Pune Politics) निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना अपेक्षित यश न मिळाल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या राजकारणात (Ajit Pawar) मोठ्या हालचालींना वेग आला आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही पक्षांमध्ये काहीतरी निर्णायक घडत ( Sharad Pawar) असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. त्यामुळेच (Pune Mahapalika Election) राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष आता बारामतीकडे लागलं आहे. (Baramati News)

महापालिका निवडणुकांमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या बालेकिल्ल्यांमध्ये अजित पवारांनी पूर्ण ताकद पणाला लावली होती. मोफत मेट्रो, बससेवेच्या घोषणा, आक्रमक प्रचार, स्थानिक नेत्यांची फौज मैदानात उतरवूनही राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढूनही भाजप-महायुतीसमोर फारसा प्रभाव पाडता आला नाही. यामुळे आता येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर काल सकाळपासून उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये तळ ठोकून आहेत. पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत ते बैठका घेत असून आगामी निवडणुकांची रणनीती आखत आहेत. या बैठकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार अचानक बारामती हॉस्टेलमध्ये दाखल झाले आणि त्यांनी अजित पवारांची भेट घेतली. ही भेट केवळ औपचारिक नसून त्यामागे मोठी राजकीय गणितं असल्याचं बोललं जात आहे.
खरं तर या भेटीआधीच काल मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. अजित पवार यांनी थेट शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी शरद पवार गटाचे आमदार आणि खासदार उपस्थित होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र कसे लढू शकतात, यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, या भेटीनंतर अजित पवारांनी माध्यमांसमोर हा विषय टाळण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर संध्याकाळी सोलापूर जिल्ह्यातील खासदार आणि आमदार बारामतीत अजित पवारांना भेटायला पोहोचले. मोहोळ, माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद गटांमधील तिढा सोडवण्यासाठी ही बैठक झाल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीला शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर, आमदार नारायण आबा पाटील, आमदार अभिजीत पाटील तसेच अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील उपस्थित होते.
या सर्व बैठकींचा केंद्रबिंदू एकच आहे, आगामी ग्रामीण निवडणुका. महापालिकांमध्ये झालेल्या पराभवानंतर राष्ट्रवादीला ग्रामीण भागातही फटका बसू नये, यासाठी दोन्ही पक्ष एकत्र लढण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या निवडणुका एकाच चिन्हावर लढवण्याचा प्रस्तावही चर्चेत आहे. तुतारी की घड्याळ, यावर एकमत होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात मतदारांचा संभ्रम टाळण्यासाठी घड्याळ चिन्हावर लढण्यावर अजित पवार आग्रही असल्याचं समजतं.
राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या राजकारणातून झाला आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये अपयश म्हणजे पक्षाच्या मुळावर घाव ठरणार आहे. याच कारणामुळे शरद पवार आणि अजित पवार दोघेही ही लढाई अत्यंत गांभीर्याने घेत आहेत.
आज रोहित पवार आणि अजित पवार यांची झालेली भेट, काल शरद पवार यांच्याशी झालेली चर्चा आणि सोलापूरच्या नेत्यांची बारामतीत झालेली गर्दी, हे सगळे संकेत एकाच दिशेने जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीतरी मोठा निर्णय होण्याच्या उंबरठ्यावर आहे. तो निर्णय दोन्ही पक्षांना पुन्हा एकत्र आणणारा ठरेल की केवळ निवडणूकपुरतं गणित ठरेल, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. मात्र, एवढं नक्की की राष्ट्रवादीच्या राजकारणात सध्या शांतता नाही, तर हालचालींचं वादळ सुरू झालं आहे.







