हडपसर, ता. 28: हडपसर परिसरातील पुणे-सोलापूर महामार्गावर पंधरा नंबर ते गाडीतळ दरम्यानच्या रस्त्यावर वाढलेल्या अवैध अतिक्रमणांवर पुणे महानगरपालिकेने आज शुक्रवारी (ता. 28) सकाळपासून जोरदार कारवाई सुरू केली आहे. या कारवाईदरम्यान अनधिकृतपणे बांधलेली दुकाने व संरचनांवर जेसीबी, ट्रॅक्टर-ट्रकच्या सहाय्याने हटविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कारवाई दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे.
अवैध अतिक्रमणांमुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी व अपघातांची शक्यता वाढल्याने नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत होत्या. त्यानुसार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही मोठी कारवाई राबवून अनधिकृत दुकाने हटविण्याची मोहीम सुरू केली आहे.







