पुणे: पुणे शहराच्या औंध-बाणेर भागात गेल्या काही दिवसांपासून दहशत पसरवणाऱ्या बिबट्याचा शोध अजूनही सुरू आहे. वन विभागाने सिंध सोसायटी परिसरात केलेल्या शोध मोहिमेत बिबट्याच्या उपस्थितीचे पुरावे हाती लागले आहेत.

वन विभागाच्या पथकाने शोध मोहीम राबवताना सिंध सोसायटी परिसरात बिबट्याच्या उपस्थितीचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. त्यांना तिथे बिबट्याचे केस तसेच त्याच्या पावलांचे ठसे आढळून आले. यावरून एक गोष्ट निश्चित झाली आहे की, बिबट्या याच परिसरात वावरत आहे. मात्र, हा बिबट्या एका ठिकाणी स्थिर राहत नाही, तो सतत जागा बदलत आहे. त्यामुळे सिंध, नॅशनल, आरबीआय सोसायटी आणि महत्त्वाचे म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरातील लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
वन विभागाचे 30 आणि रेस्क्यू संस्थेचे 10 असे एकूण 40 कर्मचारी बिबट्याचा शोध घेत आहेत. सोमवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून पुन्हा शोधमोहीम सुरू झाली. रात्री बिबट्या बाहेर पडण्याची शक्यता जास्त असल्याने, सिंध सोसायटीत सायंकाळी 7 वाजता थर्मल ड्रोन आकाशात सोडण्यात आला. सोमवारी रात्रीच्या शोधमोहिमेत ताजे पुरावे हाती लागल्याने वन अधिकाऱ्यांनी शोधकार्याला अधिक गती दिली आहे.
बिबट्याची एन्ट्री आता औंध नंतर मुंजाबावस्ती भागात सोमवारी पहाटेच्या वेळी बिबट्या नागरिकांना दिसला. मागच्या अनेक वर्षात निगडी, धानोरी, सीएमई-बोपखेल, दिघी-डीआरडीओ आणि मुळा नदीच्या किनाऱ्याकडील भागात बिबट्या अनेकदा दिसला आहे.
बिबट्या आजूबाजूच्या दाट झाडीत लपला असण्याची शक्यता अधिक आहे. सोमवारी दिवसभर कोथरूड, पाषाण, बाणेर या भागातून बिबट्या दिसल्याचे अनेक फेक कॉल वन अधिकाऱ्यांना आले. रात्री उशिरा सेंड जोसेफ हायस्कूल बाणेर येथे बिबट्या दिसल्याच्या अफवा पसरल्या होत्या, परंतु याला वन विभागाने दुजोरा दिला नाही.
बिबट्या एकाच ठिकाणी थांबत नसल्याने सर्व नागरिकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनी बिबट्या दिसल्यास त्वरित वन विभाग किंवा पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.







