लोणी काळभोर, ता. 9 : पुणे शहर तसेच पुणे (Pune News) जिल्ह्यातील रस्ते, हायवे, शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर पान टपऱ्यांचा सुळसुळाट झाल्याचे चित्र समोर आले आहे. या टपऱ्यांमधून नशिले पान, तंबाखूजन्य पदार्थ आणि आरोग्यास अपायकारक वस्तूंची सर्रास विक्री होत असल्याने विशेषतः शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनतेचा धोका वाढत असल्याची गंभीर चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गोविंद वारघडे यांनी महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक, पुणे शहराचे पोलिस आयुक्त, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक, झोन क्रमांक 7 चे पोलिस उपायुक्त, तसेच वाघोली आणि लोणिकंद पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक व अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, अनेक ठिकाणी विना परवाना पान टपऱ्यांद्वारे तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री केली जात आहे. ही विक्री सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ (COTPA) अधिनियम 2003, अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 तसेच भारतीय दंड संहिता कलम 268, 269 व 270 या कायद्यांचे स्पष्ट उल्लंघन असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, शाळा व महाविद्यालयांच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी असतानाही अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवून विक्री सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे शहर व जिल्ह्यातील सर्व बेकायदेशीर पान टपऱ्यांवर पोलिस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्त मोहीम राबवून तपासणी करावी व संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी वारघडे यांनी केली आहे. तसेच शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात विशेष मोहिमा राबवून अल्पवयीन विद्यार्थ्यांना नशेच्या पदार्थांपासून संरक्षण देणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, वाढत्या व्यसनाधीनतेच्या पार्श्वभूमीवर हा सामाजिकदृष्ट्या गंभीर प्रश्न असून प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.







