पुणे: पुण्यातील भाजी मंडईमध्ये भाज्यांची आवक प्रचंड घटल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना महागाईचा मोठा झटका बसला आहे. फळभाज्या आणि काही महत्त्वाच्या भाज्यांचे दर 20 ते 25 रुपयांनी वाढले आहेत. या अनपेक्षित दरवाढीमुळे गृहिणींना घरातील खरेदीचे अर्थकारण (बजेट) सांभाळताना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक भाज्यांच्या दराने आज नवा उच्चांक गाठला आहे.

‘या’ भाज्या झाल्या महाग:
फळभाज्यांच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. शेवगा चक्क 400 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. गवार 120 रुपये, भेंडी 90 रुपये आणि तोंडली 90 रुपये किलो दराने उपलब्ध आहेत. याशिवाय, टोमॅटो 50 रुपये, वाटाणा 90 रुपये, आणि बिन्स 70 रुपये किलो दराने मिळत आहेत. कारली 80 रुपये, वांगी 50 रुपये तर मिरचीचे दर वाढून 50 रुपये किलो झाले आहेत.
पालेभाज्यांच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिरता दिसून येत आहे. मेथी, शेपू आणि पालक यांसारख्या पालेभाज्या 25 रुपये प्रति जुडी दराने विक्री केल्या जात आहेत. दुसरीकडे, कोथिंबीर थोडी स्वस्त झाली असून, ती 15 रुपये प्रति जुडी दराने मिळत आहे.
थंडीमुळे बाजारात दिल्लीहून आलेल्या गाजरांची आवक मोठ्या प्रमाणात झाली असून, ते 50 ते 60 रुपये प्रति किलो दराने विकले जात आहे. ग्राहकांना दिलासा देणारी गोष्ट म्हणजे बटाटे, लसूण आणि आले यांचे दर स्थिर आहेत. कांदे 10 ते 20 रुपये किलो दराने उपलब्ध असून, बटाटा 30 रुपये किलो, लसूण 90 रुपये किलो आणि आले 70 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.







