पुणे: देशभरात होळीचा उत्साह असताना पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोरेगाव पार्क-मुंढवा रस्त्यावरील एका आलिशान इव्हेंटमध्ये तांत्रिक बिघाडामुळे मोठी दुर्घटना घडली. एका खासगी कंपनीने आयोजित केलेल्या होळीच्या कार्यक्रमात लाईटचा लोखंडी गर्डर अचानक कोसळला, ज्याखाली चिरडून किमान 15 ते 16 तरुण-तरुणी जखमी झाले आहेत.

मुंढव्यातील ‘रॉयल फार्म्स’ या ठिकाणी होळीनिमित्त एका भव्य पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी जवळपास एक हजारांहून अधिक तरुण-तरुणींची उपस्थिती होती. संगीत आणि रंगांच्या धुंदीत कार्यक्रम सुरू असतानाच गर्डर उपस्थितांच्या अंगावर कोसळला. जखमींपैकी चौघांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
या भीषण दुर्घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत कार्यक्रम थांबवला आणि आयोजकांवर कारवाईचे संकेत दिले आहेत. कार्यक्रमासाठी तांत्रिक सुरक्षेचे नियम पाळले होते का आणि एक हजारांहून अधिक लोकांच्या गर्दीसाठी योग्य व्यवस्थापन केले होते का? याचा सखोल तपास सुरू आहे.






