वालचंदनगर, (पुणे) : उसनवारी पैशांच्या वादातून 22 वर्षीय (Indapur News) फळ व्यापाऱ्यावर कोयता फेकून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची थरारक घटना पिटकेश्वर येथे घडली. पिटकेश्वर (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील गाव हद्दीत शिवशंभो किराणा स्टोअरसमोर सोमवारी (ता. 03) सायंकाळी पाच ते साडेपाचच्या सुमारास हि घटना घडली. याप्रकरणी आठ जणांवर वालचंदनगर पोलीस्त ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओम हनुमंत येरळकर (वय 22, व्यवसाय फळे व्यापारी, रा. पिटकेश्वर) असे मारहाण झालेल्या फळ व्यापाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी येरळकर यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार आप्पासाहेब वाघमोडे (रा. पिटकेश्वर, ता. इंदापूर), जय कुदळे (रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर), ललेंद्र रणदिवे (रा. सराफवाडी इंदापुर), अभिजीत जगताप, (रा. निमगाव केतकी ता इंदापुर), अमोल उघडे (रा. निमगाव केतकी ता इंदापुर), हर्षद सुर्यवंशी (पिटकेश्वर, ता. इंदापुर) व इतर दोन अनोळखी इसम) असे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम येरळकर हे निमगाव केतकी येथील डोंगरे कॉम्प्लेक्समधून फळांचा माल खरेदी करून विविध बाजारपेठांत विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. येथील जय कुदळे याच्याशी ओळख झाल्यानंतर त्याने वारंवार उसनवारी पैशांची मागणी केली. पैसे परत मागितल्यावर “इथे धंदा करायचा असेल तर पैसे द्यावे लागतील” अशी धमकी देत भांडण केल्याचे नमूद आहे. 22 फेब्रुवारी रोजी डोंगरे कॉम्प्लेक्स येथे त्याने चापट मारून दमदाटी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
रविवारी (ता. 01) रोजी फजल पेट्रोलपंप येथे जय कुदळे व आप्पासाहेब वाघमोडे यांनी मोटारसायकल आडवी लावून “संध्याकाळपर्यंत जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
यानंतर सोमवारी (ता. 02)सायंकाळी पाचच्या सुमारास शिवशंभो किराणा स्टोअरसमोर ओम मित्रासोबत बसले असताना आरोपी तिघे मोटारसायकलवरून तेथे आले. आप्पासाहेब वाघमोडे यांनी “तुझं कोण येणार आहे त्याला बोलवून घे, आज इथं मुळशी पॅटर्न होणार आहे” अशी उघड धमकी दिली. त्याचवेळी ललेंद्र रणदिवे याने कमरेतील कोयता काढून उपस्थितांना धाक दाखवला, तर जय कुदळे याने कोयता थेट ओम यांच्या दिशेने फेकला. सुदैवाने त्यांनी तो वार चुकवला.
यानंतर आरोपींनी लाकडी दांडक्यांनी मारहाण करण्यासाठी धाव घेतली. “तुला जिवंत ठेवणार नाही, खोट्या गुन्ह्यात अडकवू,” अशी धमकी देत शिवीगाळ करण्यात आली. गावातील नागरिकांनी मध्यस्थी करून वाद सोडविल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.
दरम्यान, या प्रकरणी वरील आठ जणांवर भारतीय न्याय संहिता कलम 190, 189(2), 191(2), 191(3), 125, 352, 351(2) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(3), 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पुढील तपास सुरू आहे.







