पुणे: पुणे (Pune News) महापालिकेने शहरातील रस्ते नोव्हेंबर अखेरपर्यंत खड्डेमुक्त करण्याचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, काम आता अधिक पारदर्शक आणि अचूक व्हावीत यासाठी प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. खड्डे दुरुस्तीच्या प्रत्येक कामाची नोंदणी आता गुगल मॅपवर आधारित जीआयएस प्रणालीमध्ये करण्याची सक्ती करण्यात आली आहे.

जीआयएस प्रणालीच्या वापराने कामांमध्ये मोठी सुलभता येणार आहे. पालिका प्रशासनाला एका क्लिकवर प्रत्येक कामाची तपासणी करणे सोपे होईल. आणि भविष्यात पडताळणी करणेही शक्य होणार आहे. याप्रकरणी अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी कडक आदेश जारी केले आहेत. नोंदणी झाल्यानंतर उपअभियंत्यांनी 100%, अधिक्षक अभियंत्यांनी 40% आणि मुख्य अभियंत्यांनी 10% कामांची तपासणी करणे बंधनकारक आहे.
खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण झाल्यावर दररोज रात्री 10 वाजेपर्यंत अभियंत्यांना सर्व माहिती सबंधित प्रणालीवर भरावी लागणार आहे. पालिका वर्षभर रस्ते दुरुस्तीची कामे करत असली तरी, या नोंदी एकाच ठिकाणी उपलब्ध होत नव्हत्या; आता ही माहिती एकाच जीआयएस प्रणालीवर उपलब्ध असल्याने काम अधिक पारदर्शक होणार आहे.
महापालिकेने कोणतीही निविदा न काढता विविध ठेकेदारांची नियुक्ती या अभियानासाठी केली आहे. त्यामुळे कामांची अचूक नोंद ठेवणे महत्त्वाचे आहे. दरम्यान, या नोंदीमुळे भविष्यकाळात आवश्यक उपाययोजना करणे प्रशासनास शक्य होईल.







