मुंबई: मुंबईतील (Crime News) कुर्ला पश्चिम परिसरातून एका अतिशय धक्कादायक घटनेची बातमी समोर आली आहे. वाढदिवस साजरा करत असतानाच, काही मित्रांनी अब्दुल रहमान नावाच्या 21 वर्षीय तरुणावर अंडी आणि दगडफेक केल्यानंतर पेट्रोल टाकून त्याला पेटवून देण्याचा क्रूर जीवघेणा प्रयत्न केला. या हल्ल्यात तरुण गंभीररित्या भाजला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अब्दुल रहमानचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रात्री 12 वाजता त्याचे पाच मित्र आले. केक कापल्यानंतर मित्रांनी सुरुवातीला अब्दुलवर अंडी आणि दगड फेकले. याच दरम्यान, त्यांनी स्कूटीतून पेट्रोल काढले अब्दुलच्या अंगावर ओतले आणि आग लावली. आग लागल्याने अब्दुल रहमानने कपडे काढण्याचा प्रयत्न केला ज्यात तो गंभीर जखमी झाला.
पोलिसांनी पीडित अब्दुलच्या तक्रारीवरून तात्काळ आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 110 (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न) आणि कलम 3 (5) अंतर्गत एफआयआर (FIR) नोंदवला असून हल्ल्यात सामील असलेल्या या पाचही आरोपींना अटक केली आहे. अयाज़ मलिक, अशरफ़ मलिक, कासिम चौधरी, हुज़ैफ़ा खान, आणि शरीफ़ शेख अशी आरोपींची नावे आहेत.
दरम्यान, हा केवळ अपघात होता की यामागे काही जुने वैमनस्य होते, याचा सखोल तपास सध्या पोलिस करत आहेत.







