पुणे: राजगुरुनगरमध्ये पत्नीची हत्या करून फरार झालेल्या माजी सैनिकाचा मृतदेह चांडोली परिसरात आढळून आला. महेंद्र शिवाजी दौंडकर (वय 45) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. भीमा नदीकाठी एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह बुधवारी, 2 सप्टेंबर रोजी पोलिसांना आढळला. प्राथमिक तपासात महेंद्रने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून पुढील तपास सुरू आहे.

30 ऑगस्टच्या रात्री राजगुरुनगरमधील वाडा रोड परिसरात महेंद्र दौंडकर याने पत्नी दीपा महेंद्र दौंडकर (वय 40) यांच्यावर हल्ला करून त्यांचा गळा आवळून खून केला होता. पत्नी आपल्या बहिणीशी बोलत नसल्याच्या कारणावरून दोघांमध्ये यापूर्वीही वाद होत असल्याचे पोलिस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेनंतर त्यांचा 17 वर्षीय मुलगा अथर्व याला लक्षात आले. त्यानंतर त्याने वडिलांना याबाबत विचारणा केली. त्यावेळी महेंद्रने मुलावरही हल्ला केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मुलाला गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याच्यावर चाकूनेही हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. या झटापटीत मुलाच्या अंगठ्याला दुखापत झाली. आरडाओरडा झाल्यानंतर नातेवाईक आणि शेजारी घटनास्थळी आले. मात्र, त्याआधीच महेंद्र घरातून पसार झाला होता.
या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात महेंद्र दौंडकरविरोधात खुनासह खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांची पथके त्याचा शोध घेत होती. दरम्यान, 2 सप्टेंबर रोजी चांडोली गावच्या हद्दीत भीमा नदीजवळ त्याचा मृतदेह सापडला. महेंद्र दौंडकर हे 2019 मध्ये लष्करातून निवृत्त झाले होते. त्यानंतर ते पुण्यातील एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते.







