Pune Cyber Crime: पुणे : पुणे (Pune) जिल्ह्यातील दौंड तालुक्यात सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीची एक नवी आणि अत्यंत घातक पद्धत सुरू केल्याचे समोर आले आहे. ई चलन भरण्याच्या नावाखाली नागरिकांचे मोबाईल हॅक केले जात असून, यामुळे आर्थिक नुकसान होण्याचे प्रकार वाढत आहेत. केडगाव येथील एका पोलीस अधिकाऱ्याला आणि कुरकुंभ येथील एका शिक्षकाला या सायबर फसवणुकीचा फटका बसला आहे. Pune Cyber Crime

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगार व्हॉट्सअॅप किंवा टेलिग्रामवर तुमच्या गाडीचे ई चलन भरा असा संदेश पाठवतात. या संदेशासोबत एक APK फाईल जोडलेली असते. संबंधित व्यक्तीने ही फाईल उघडताच मोबाईलमध्ये आपोआप तीन संशयास्पद अॅप्लिकेशन इन्स्टॉल होतात. यानंतर हॅकर्स मोबाईलचा पूर्ण ताबा घेतात.
मोबाईल हॅक झाल्यानंतर सायबर गुन्हेगार संबंधित व्यक्तीच्या मोबाईलमधील कॉन्टॅक्ट लिस्टचा वापर करतात. त्या व्यक्तीच्या प्रोफाइल फोटोसह मित्रपरिवार आणि नातेवाईकांना मी हॉस्पिटलमध्ये आहे, तातडीने पैशांची गरज आहे, असे संदेश पाठवले जातात. त्यामुळे ओळखीच्या व्यक्तीचा मेसेज समजून काही जण पैसे पाठवतात आणि फसवणूक होते.
केडगाव येथील पोलीस अधिकारी आणि कुरकुंभ येथील शिक्षक यांच्या बाबतीतही हाच प्रकार घडला आहे. त्यांच्या मोबाईलवर आलेली APK फाईल उघडल्यानंतर काही वेळातच मोबाईल हॅक झाला आणि त्यांच्या ओळखीच्या लोकांकडे पैशांची मागणी करणारे मेसेज गेले.
या प्रकाराबाबत यवत पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण देशमुख यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सरकारी यंत्रणा कधीही APK फाईल पाठवून दंड भरण्यास सांगत नाहीत. त्यामुळे अनोळखी नंबरवरून आलेले ई चलन भरण्याचे मेसेज, लिंक किंवा फाईल चुकूनही उघडू नयेत, असे त्यांनी सांगितले आहे.
सायबर फसवणुकीचा संशय आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर क्राइम विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.







