अमित मुंडीक

रांजणगाव (ता. शिरूर): रांजणगाव एमआयडीसी येथील चमाडीया गोडाऊनमधून आयटीसी कंपनीचे सिगारेट, बिस्किटे, साबण व इतर वस्तूंची मोठ्या प्रमाणावर झालेली चोरी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या 72 तासांत उघडकीस आणली आहे. या कारवाईत चोरीस गेलेला माल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 68 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Pune Crime News)
रांजणगाव एमआयडीसीतील चमाडीया गोडाऊनमध्ये आयटीसी कंपनीचा माल साठवून तो ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून डिलरकडे पाठवण्यात येतो. ‘मुव्हिंग लॉजिस्टिक प्रा. लि.’च्या चार इलेक्ट्रिक पिकअप वाहनांमध्ये रात्री माल भरून ठेवण्यात येतो. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत 17 डिसेंबर रोजी पहाटे 6.40 वाजता अज्ञात चोरट्यांनी मालाने भरलेले इलेक्ट्रिक पिकअप वाहन सुरू करून गेटवर चलन नोंद करत वाहनासह 65 लाख 98 हजार 897 रुपये किमतीचा माल चोरून नेला होता.

या प्रकरणी दीपक देवदास शिंदे (रा. लोणीकंद, ता. हवेली) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा रजिस्टर नं. 478/2025 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये दाखल करण्यात आला होता.
औद्योगिक क्षेत्रातील या गंभीर चोरीची दखल घेत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी विशेष पथक नेमण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तातडीने तपास सुरू केला.
तपासात चोरी केलेले इलेक्ट्रिक पिकअप वाहन गोडाऊनपासून काही अंतरावर सोडून दिल्याचे आढळून आले. या वाहनातून सुमारे 54.53 लाख रुपयांचे सिगारेट चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले. चोरीसाठी आणखी एका वाहनाचा वापर झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तब्बल 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले.
दरम्यान, पोलीस अंमलदार उमेश कुतवळ यांनी वाघोली परिसरातील कावेरी हॉटेलजवळ संशयित वाहन मालाची डिलिव्हरी करत असताना पकडले. वाहन मालक, सुपरवायझर व चालकांची चौकशी केली असता सुपरवायझर प्रथमेश चव्हाण याने आरोपी दीपक ज्ञानेश्वर ढेरंगे व अल्ताफ आयुब मुल्ला यांना चोरीसाठी वाहन दिल्याची कबुली दिली. त्यानंतर प्रथमेश ज्ञानेश्वर चव्हाण (रा. वाघोली) यास अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत चोरीस गेलेला माल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 68 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपी दीपक ज्ञानेश्वर ढेरंगे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर शिक्रापूर, सिंहगड रोड व लोणीकंद पोलीस ठाण्यात चोरीचे एकूण आठ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले (शिरूर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोलीस निरीक्षक अविनाश थोरात, सहा. फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस अंमलदार उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर, माणिक काळकुटे व अमोल रासकर सहभागी होते.
पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश थोरात करीत आहेत.







