Pune Crime : शिरूर: शिरूर तालुक्यातील शरदवाडी परिसरातील जांबुत-जोरीलवन येथे 90 वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सुमारे 4 लाख 80 हजार रुपये किमतीचे सहा तोळे सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या आरोपीला शिरूर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत अटक केली.चोरीस गेलेले सर्व दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
या घटनेबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शुक्रवारी (ता. 20 ) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी नातेवाईकांसह लग्नकार्याकरिता बाहेर गेले असताना त्यांच्या घरासमोरील व्हरांड्यात बसलेल्या त्यांच्या आई लहानूबाई सखाराम सरोदे (वय 90) यांच्या गळ्यातील सहा तोळे सोन्याचे दागिने एका अज्ञात इसमाने बळजबरीने हिसकावून नेले. या दागिन्यांची अंदाजे किंमत 4 लाख 80 हजार रुपये आहे.
या प्रकरणी फिर्यादी मच्छिंद्र सखाराम सरोदे (रा.शरदवाडी, जांबुत- जोरीलवन,ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाला आरोपीचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले.तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास सुरू करण्यात आला. या दरम्यान आरोपी आकाश किसन मेरगळ (वय 20,रा. पंचतळे-जांबुत, ता. शिरूर, जि. पुणे) याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेले सहा तोळे वजनाचे, 4 लाख 80 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक करांडे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल,अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक करांडे,पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण तसेच पोलीस अंमलदार नितेश थोरात, सचिन भाई,विजय शिंदे,निरज पिसाळ, निखिल रावडे, अजय पाटील, दादाराव नागरे, भाऊसाहेब ठोसरे, शंकर बल्लाळ यांच्या पथकाने केली.
या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे आरोपीला अटक होऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.






