दौंड: दौंडमधील कुरकुंभ एमआयडीसी भागात एका गंभीर गुन्हेगारी प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ‘समर्थ लॅबोरेटरीज’ या कंपनीच्या नावाखाली विषारी आणि नकली दारू तयार करण्यासाठी लागणाऱ्या घातक रसायनांची निर्मिती केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या ‘अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स’ने केलेल्या धाडसी कारवाईमुळे या टोळीचा कारनामा समोर आला असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी या कंपनीवर सुमारे दीड महिना लक्ष केंद्रित केले होते. २९ जूनच्या रात्री पुणे ग्रामीण पोलीस यांच्यासह दौंड पोलीसांनी कारखान्यावर छापा टाकला. सलग ६ तास चाललेल्या कारवाईनंतर ही लॅब सीलबंद करण्यात आली. तपासात ३,४२० किलो प्रतिबंधित ‘क्लोरल हायड्रेट’ आणि ५,८०० लिटर घातक रसायने पोलिसांना सापडली. फॉरेन्सिक तपासणीनुसार, या जप्त केलेल्या साहित्यातून जवळपास १५ लाख लिटर नकली दारू तयार होऊ शकली असती, जी नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरली असती.

या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे. किशोर दत्तात्रय सुर्वे (वय 52), शैलेश विठ्ठल ठाकूर (वय 55), नवी सरवर जमीर सिद्दिकी (वय 40) आणि आदेश विठ्ठल पाचांगणे (वय 58) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. मुख्य आरोपी किशोर सुर्वे हा या कंपनीचा मालक असून, त्याच्यावर यापूर्वीही एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत. छाप्यादरम्यान पोलिसांनी सुमारे 1 कोटी रुपये किमतीची सेंट्रीफ्युगल आणि जीएलआर (GLR) मशिनरीही जप्त केली आहे.
या टोळीने यापूर्वीही नकली दारूचा साठा बाजारात विकला असावा, असा संशय पोलिसांना आहे. आता ग्रामीण पोलीस या रॅकेटमधील अन्य सहभागींचा शोध घेण्यासाठी सखोल तपास करत आहेत. या कारवाईमुळे बेकायदेशीर मद्य उत्पादन करणाऱ्या टोळ्यांना मोठा दणका मिळाला आहे.







