पुणे, ता. 24: दामदुप्पट रकमेचे आमिष दाखवून 40 हजारांहून अधिक गुंतवणूकदारांना 4 हे 5 हजार कोटी रुपयांना गुंडा घालणाऱ्या हडपसर (पुणे) समर्थ क्रॉप केअरच्या ( Prashant Gavali Samarth Crop Care Scam) प्रशांत गवळीमुळे एका गुंतवणूकदाराचा बळी गेला आहे. लाखो रुपयांच्या गुंतवणुकीतील केवळ 50 हजार उपचारासाठी मागत होते. परंतु, पैसे न मिळाल्याने त्यांचा रविवारी (ता.21) अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रशांत गवळीने परतावा न दिल्याने पहिला बळी गेल्याची गुंतवणूकदारांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.

तसेच प्रशांत गवळीवर (Prashant Gavali Samarth Crop Care Scam) सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी गुंतवणूकदार पुढील दोन दिवसात पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे करणार आहेत. अशी खात्रीशीर माहिती मिळत आहे. तर या घटनेमुळे गुंतवणूकदारांचा प्रशांत गवळीवर रोष वाढला आहे.
रमेश मारुती गाडेकर असे उपचारादारम्यान मृत्यू झालेल्या गुंतवणूकदाराचे नाव आहे. गाडेकर यांनी समर्थ क्रॉप केअर कंपनीत 2 ते अडीच लाखांहून अधिक रक्कम गुंतवली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. समर्थ क्रॉप केअरने गुंतवणूकदारांना प्रतिमाह 10 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले आहे. संस्थेने पुण्यासह राज्यातील 12 हून अधिक जिल्ह्यातील 40 ते 45 हजाराहून अधिक गुंतवणूकदरांची 4 ते 5 हजार कोटी रुपयांची बेकायदा माया गोळा केली आहे.
मागील चार महिन्यांपासून ही संस्था दिवाळखोरीत गेल्याने कोणत्याही गुंतवणूकदाराला एक दमडीही दिलेली नाही. परंतु, प्रशांत गवळी हा गुंतवणूकदारांना पैसे कधी देणार? या मूळ प्रश्नाला बगल देत गुंतवणूकदारांची दिशाभूल करत आहे. संस्थाचालकांनी गुंतवणूकदारांना दिलेले चेक सुद्धा बाऊन्स झाला आहे. आपले पैसे बुडतील या भीतीने अनेक गुंतवणूकदारांना धसका बसला आहे. आपली आयुष्याची जमापुंजी बुडणार या धसक्याने गाडेकर आजारी पडले होते.
रमेश गाडेकर यांच्यावर एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरु होते. गाडेकर यांच्यावरील उपचारासाठी पैसे कमी पडत असल्याने त्यांच्या कुटुंबाने प्रशांत गवळी यांच्याकडे केवळ 50 हजार रुपये मिळावेत. म्हणून अनेकवेळा विनवणी केली होती. वारंवार मागणी करून देखील त्यांच्या उपचारासाठी प्रशांत गवळीने पैसे दिले नाहीत. अखेर रमेश गाडेकर यांचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे..
दरम्यान, आपला सहकारी गुंतवणूकदार गाडेकर याला दवाखान्यातील उपचारासाठी समर्थ क्रॉप केअरच्या प्रशांत गवळीने पैसे दिले नाहीत. वेळेवर उपचार न भेटल्यामुळे गाडेकर यांचा मृत्यू झाला आहे. याला सर्वस्वी जबाबदार हा प्रशांत गवळी असल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे. तसेच त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. यासाठी गुंतवणूकदार पुढील दोन दिवसात पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना भेटून मागणी करणार आहेत.
समर्थ क्रॉप केअर घोटाळ्यातील मुख्य आरोपी प्रशांत अनिल गवळी (वय -35) याच्यासह ज्योती प्रशांत गवळी (वय -35), नागनाथ धोंडिबा जाधव (वय -35), पंडित राठोड, दिपक कटारे,चंद्रकांत राऊत, अविष्कार सुरवसे (वरील सातही रा. लेन नं. 3, गजानन महाराज मंदीर, तुकाई दर्शन, बिजली नगर,पुणे), सुदामा दास, मोनीषा सुदामा पाने उर्फ दास, प्रकाश मंगाने (तिघेही रा.सिंहगड रोड,पुणे) व जोतीबा महादेव काटकर (रा.हडपसर, पुणे) या अकरा जणांच्या विरोधात गुंतवणूकदरांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली आहे. परंतु, वरील सर्व आरोपी हे फरार झाले आहेत.
गुंतवणूकदारांचे भवितव्य अंधारात
प्रशांत गवळी याने गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केली आहे. परंतु, प्रशांत गवळी व त्याचे सहकारी आता कोणाच्याही संपर्कात नसून, गुंतवणूकदारांना कोणताही परतावा मिळत नाही. तो पळून गेल्याची दाट शक्यता आहे. गुंतवणूकदरांनी पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु, पैसे मिळतील की नाही याची कोणतीही शाश्वती नसल्यामुळे 40 हजाराहून अधिक गुंतवणूकदारांचे भवितव्य अंधारात सापडले आहे.







