बार्शी, (सोलापूर) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार दिलीप सोपल यांच्या आळगाव रोडवरील बंगल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास पेटते फटाके टाकून दहशत निर्माण केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे बंगल्याच्या परिसरातील झाडांना आग लागून मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेमुळे बार्शी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार तथा माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या विजयाचा जल्लोष सुरू असताना काही जणांनी आमदार दिलीप सोपल यांच्या बंगल्यावर मोठ्या प्रमाणात पेटते फटाके फेकले. फटाक्यांमुळे बंगल्यातील आंबा, जांभूळ आणि बांबूच्या झाडांना आग लागून आगीच्या ज्वाळा भडकल्या.

बंगल्याबाहेर आरडाओरड सुरू असल्याने आमदार सोपल यांचे बंधू सुधीर सोपल आणि कर्मचारी गुरुपादप्पा स्वामी जागे झाले. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता काही तरुण बंगल्याच्या परिसरात घुसून पेटते फटाके टाकत असल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
या प्रकरणी पोलिसांनी नाथा मोहिते, योगेश लोंढे, आशिष शिंदे, कुणाल खंदारे, राज देवकुळे, पेशा रणझुंजारे, नागेश मोहिते आणि अंबादास रणझुंजारे या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमागे विधान परिषद निवडणुकीचा निकाल आणि राजकीय सुडबुद्धी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब जाधव करीत आहेत.







