सागर जगदाळे

भिगवण (ता. इंदापूर) : पुणे-सोलापूर महामार्गालगत डाळज नं. 2 गावच्या हद्दीत एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी भिगवण पोलिसांनी नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास डाळज नं. 2 येथील चौकात अंदाजे 40 वर्षांचा एक पुरुष पडलेला आढळला. ही बाब लक्षात येताच पिलेवाडी येथील भरत बबन ओगले यांनी त्याला रुग्णवाहिकेतून भिगवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सायंकाळी 6.15 वाजता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

या घटनेची भिगवण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेहाचे शवविच्छेदनही पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, मृत व्यक्तीची ओळख समजू शकलेली नाही.
ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन
मृत व्यक्तीचे वय अंदाजे 40 वर्षे असून उंची सुमारे 168 सेंटीमीटर आहे. त्याचा रंग सावळा असून केस काळे-पांढरे आणि वाढलेले आहेत. मृतदेहावर काळ्या रंगाचा पूर्ण बाह्यांचा शर्ट आणि काळी पूर्ण पॅन्ट होती.
या वर्णनाशी मिळतीजुळती व्यक्ती बेपत्ता असल्यास किंवा मृत व्यक्तीबाबत कोणाकडे माहिती असल्यास भिगवण पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक फौजदार प्रमोद गलांडे यांनी केले आहे.
संपर्क क्रमांक : 9552164100 / 02118-246233






