विशाल शिंदे

भोर: पुण्याकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या महामार्गालगत भोर तालुक्यातील खुटवड वस्ती परिसरात उभ्या असलेल्या एका संशयित कारमधून इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हायवे लगतच्या सर्विस रोडवर एक स्विफ्ट डिझायर कार (MH 46 CL 5952) बराच वेळ एकाच ठिकाणी उभी असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. गाडीत कोणतीही हालचाल दिसत नसल्याने याबाबत राजगड पोलिसांना माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कारची पाहणी केली. त्यावेळी गाडीमध्ये एका इसमाचा मृतदेह आढळून आला.
मृत व्यक्तीची ओळख, मृत्यूचे नेमके कारण तसेच हा प्रकार नेमका कशामुळे घडला याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा व पुढील तपास सुरू असून संपूर्ण तपासानंतरच अधिक माहिती देण्यात येईल, अशी माहिती राजगड पोलिसांनी दिली आहे.
ही घटना पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या खुटवड वस्ती येथील सर्विस रोडवर घडली आहे.






