मुंबई: महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या 17 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्यामुळे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या या मतदानासाठी महायुतीमधील सर्वच प्रमुख घटक पक्ष तयारीला लागले आहेत. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असून सध्या त्यांच्यात जागावाटपाची चर्चा सुरू आहे.

या जागावाटपाचा अंतिम निर्णय घेण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. सद्यस्थितीचा आढावा घेतल्यास, 17 पैकी तब्बल 14 मतदारसंघांमध्ये एकट्या भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. त्यामुळे महायुतीत भाजप ‘मोठ्या भावाच्या’ भूमिकेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुरुवातीला भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी 2 जागा लढवणार अशी चर्चा होती. मात्र, भाजपने शिवसेनेला 1 ऐवजी 4 जागांची ऑफर दिल्याचे समजते.
आकडेवारीनुसार, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेचे वर्चस्व आहे, तर परभणी-हिंगोलीत राष्ट्रवादीकडे अधिक मते आहेत. असे असले तरी रायगडच्या जागेवरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. दुसरीकडे, पुणे मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावा केला आहे, कारण तिथे त्यांचा वैयक्तिक आकडा मोठा आहे. परंतु, भाजप आणि शिवसेनेची एकत्रित मते राष्ट्रवादीपेक्षा जास्त असल्याने भाजपनेही पुण्याच्या जागेसाठी आग्रह धरला आहे.
विविध मतदारसंघांतील संख्याबळ पाहिले तर ठाण्यात एकूण 997 मतांपैकी भाजपकडे 431 आणि शिवसेनेकडे 309 मते आहेत. रायगडमध्ये 823 पैकी शिवसेनेकडे 275 तर भाजपकडे 241 मते आहेत. पुण्यात एकूण 878 मते असून राष्ट्रवादीकडे 375, तर भाजपकडे 335 मते आहेत. नागपुरात भाजपकडे 794 पैकी तब्बल 501 मतांचे स्पष्ट बहुमत आहे. सोलापूर, सांगली-सातारा, धाराशिव-लातूर-बीड आणि जळगाव या भागातही भाजपची ताकद मोठी आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, महायुती म्हणून सर्व संमतीने यावर योग्य तोडगा काढला जाईल.






