पुणे: बोरीपार्धी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला’ नागरिक आणि शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महसूल दिनाचे औचित्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त श्री बोरमलनाथ मंदिर परिसरात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दौंडचे आमदार ॲड. राहुल कुल होते. दीपप्रज्वलन तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी बोलताना आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील आगामी विकासकामांची माहिती दिली. महसूल आणि कृषी क्षेत्रातील बदलते कायदे तसेच शासनाच्या लोकाभिमुख योजनांची माहिती देताना त्यांनी अधिकाऱ्यांना नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या समस्या कालबद्ध पद्धतीने सोडवण्याचे निर्देश दिले. प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करून नागरिकांना वेळेत न्याय मिळावा, यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तहसीलदार अरुण शेलार यांनी शिबिरामागील उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी रेवन्नाथ लबडे यांनी महाराजस्व अभियानांतर्गत उपलब्ध सेवांची माहिती देत नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
या शिबिरातून विविध शासकीय विभागांच्या सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या. एकूण १,२७७ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. यामध्ये ट्रॅक्टर व शेती अवजारांचे वाटप, विविध प्रकारचे शासकीय दाखले, फेरफार व तडजोड प्रकरणांचे आदेश, ॲग्री स्टॅक नोंदणी, कर्जमुक्तीची ई-केवायसी तसेच सामाजिक सहाय्य योजनांचा समावेश होता.
महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी, कर्मचारी, महा-ई-सेवा केंद्र चालक, आशा सेविका, बीएलओ आणि सुपरवायझर यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे आभार महसूल नायब तहसीलदार डॉ. तुषार बोरकर यांनी मानले. या शिबिराला तालुक्यातील लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक आणि शेतकरी उपस्थित होते.







