ओमकार भोरडे

रांजणगाव गणपती: आज 26 जून आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नशामुक्त समाज निर्मितीचा संदेश देत पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन रॅली व व्याख्यान घेतले.

आज सकाळी 10:15 ते 11:15 वा. दरम्यान रांजणगाव गणपती गावातून नशामुक्ती रॅली काढण्यात आली. श्री महागणपती करियर अकॅडमी, रांजणगाव गणपती येथील 120 ते 150 विद्यार्थी व विद्यार्थिनी रॅलीत सहभागी झाले होते. हातात नशामुक्तीचे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी गावातून फेरी काढत “नशा सोडा, आयुष्य वाचवा”, “अंमली पदार्थांना नाही म्हणा” अशा घोषणा देत जनजागृती केली.
रॅलीनंतर सकाळी 11:30 ते 12:00 वा. दरम्यान महागणपती इंग्लिश मीडियम स्कूल, रांजणगाव गणपती येथे नशामुक्ती व्याख्यान आयोजित करण्यात आले. यातही 120 ते 150 विद्यार्थी सहभागी झाले. व्याख्यानातून अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, व्यसनाच्या विळख्यातून कसे वाचावे व नशामुक्त जीवनाचे फायदे यावर मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमासाठी पोलीस निरीक्षक कुमार कदम, सपोनि अनिल मोरडे, महिला पोलीस उपनिरीक्षक सविता काळे, PSI पासलकर, पोलीस हवालदार ब्रह्मा पोवार, संतोष औटी, सुरज वळेकर व महिला अंमलदार रोजना भोजने उपस्थित होते.
तरुण पिढी व्यसनापासून दूर राहावी व अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडू नये यासाठी रांजणगाव पोलिसांनी घेतलेल्या या पुढाकाराचे नागरिक व पालकांकडून स्वागत होत आहे.







