पोपट पाचंगे, रांजणगाव गणपती

रांजणगाव गणपती: कारेगाव, ता.शिरुर येथील नववधूवरांनी आज बोहल्यावर चढण्यापूर्वी लोकशाही बळकट करण्यासाठी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. शिरुर पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे यांची पुतणी व येथील उद्योजक संदेश कोहकडे यांची कन्या सायली व कारेगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य पृथ्वीराज नवले यांचे चिरंजीव निलेश यांचा विवाह कारेगाव येथील एका मंगल कार्यालयात आज सायंकाळी संपन्न होत असतानाही कोहकडे व नवले या उच्चशिक्षित नववधूवरांनी मतदान केंद्र गाठून आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
लग्नाची तयारी, पाहुण्यांची धावपळ व वेळेची घाई असतानाही नववधूवरांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिले. यावेळी कुटुंबातील सदस्य व मित्रमंडळी उपस्थित होते.मतदान केल्यानंतर हे दोघेही वधू वर लग्नस्थळी रवाना झाले. वधू आणि वर या दोघांनीही प्रथमच बोहल्यावर चढण्यापूर्वी एकत्र मतदान केल्याची बहुधा ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे. वधू व वर यांनी एकत्रित मतदान केल्याचे पाहून मतदान केंद्रामध्ये उत्सुकता निर्माण झाली. येथे उपस्थित नागरिकांनी कोहकडे व नवले या नव वधूवरांच्या या कृतीचे कौतुक केले.
मतदान हा लोकशाहीचा भाग असून, कोणत्याही परिस्थितीत नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा, असा संदेश या घटनेतून मिळतो, अशी प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान, येथील जुने सामाजिक कार्यकर्ते माणिककाका ओस्तवाल यांनीही वयाच्या १०५ व्या वर्षी मतदान केंद्रावर येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला.







