Accident : कोल्हापुरातील शाहू मिल चौक… ऐन वर्दळीची वेळ, वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू होती. वाहनांची ये-जा, पादचाऱ्यांची लगबग आणि रोजच्या धावपळीतील शहर पण काही क्षणांतच हे दृश्य भयावह शोकांतिकेत बदलले. भरधाव वेगात आलेल्या क्रेटा कारने एका दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि संपूर्ण परिसर हादरून गेला.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार, पांढऱ्या रंगाची क्रेटा कार अतिशय वेगात शाहू मिल चौकाच्या दिशेने येत होती. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या दुचाकीला कारने थेट धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीस्वार हवेत उडत अनेक फूट दूर फेकले गेले. काही क्षणांतच कारही रस्त्याच्या मधोमध पलटी झाली.
अपघातानंतरचे दृश्य अंगावर काटा आणणारे होते. दुचाकी अक्षरशः चक्काचूर झाली होती. रस्त्याच्या कडेला पडिक जागेत कोसळलेले दोन्ही तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मदतीसाठी धावलेल्या नागरिकांना हे दृश्य पाहून क्षणभर काय करावे सुचले नाही. तातडीने रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि जखमींना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान दोन्ही दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघातानंतर शाहू मिल चौकात मोठी गर्दी जमली, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने पलटी झालेली कार बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत केली. हा अपघात वाहनातील तांत्रिक बिघाडामुळे झाला की चालकाच्या बेदरकार वेगामुळे, याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, या घटनेने पुन्हा एकदा शहरातील वेगवान आणि निष्काळजी वाहनचालकांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.







