पुणे: होळीच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी (Pune Railway) लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पुणेकरांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे आणि हडपसर परिसरात देशातील विविध राज्यांतील नागरिक मोठ्या संख्येने नोकरी-व्यवसायासाठी राहतात. सणासुदीच्या काळात हे प्रवासी एकाच वेळी गावी निघाल्याने नियमित गाड्यांवर मोठा ताण येतो. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी भारतीय रेल्वे ने मार्च महिन्यात पुणे आणि हडपसर येथून वीरांगना लक्ष्मीबाई झांसीपर्यंत दोन साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

पुणे स्टेशनवरून धावणारी पुणे–वीरांगना लक्ष्मीबाई झांसी विशेष गाडी क्रमांक 01921 ही 5 ते 26 मार्चदरम्यान दर गुरुवारी दुपारी 3.15 वाजता सुटेल आणि पुढील दिवशी सकाळी 10 वाजता झांसी येथे पोहोचेल. परतीसाठी 01922 क्रमांकाची विशेष गाडी 4 ते 25 मार्चदरम्यान दर बुधवारी दुपारी 12.50 वाजता झांसीहून निघून गुरुवारी सकाळी 11.35 वाजता पुण्यात येईल. ही गाडी दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, नर्मदापुरम, राणी कमलापती, विदिशा, बीना आणि ललितपूर या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे.
हडपसरहून निघणारी हडपसर–वीरांगना लक्ष्मीबाई झांसी विशेष गाडी क्रमांक 01923 ही 8 ते 29 मार्चदरम्यान दर रविवारी रात्री 7.10 वाजता सुटेल आणि सोमवारी दुपारी 3 वाजता झांसीला पोहोचेल. परतीसाठी 01924 क्रमांकाची गाडी 7 ते 28 मार्चदरम्यान दर शनिवारी रात्री 7.40 वाजता झांसीहून निघून रविवारी सायंकाळी 4.30 वाजता हडपसरला येईल. या गाड्या दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, राणी कमलापती आणि बीना येथे थांबतील.
या विशेष गाड्यांमध्ये सेकंड एसीचा 1, थर्ड एसीचे 3, स्लीपरचे 7 आणि सामान्य श्रेणीचे 4 डबे असणार आहेत. यासोबतच गर्दी पाहता दौंड–अजमेर व अजमेर–दौंड तसेच खडकी–हिसार व हिसार–खडकी या साप्ताहिक विशेष गाड्यांचा कालावधीही मार्चअखेरपर्यंत वाढवण्यात आला आहे. या निर्णयामुळे होळीच्या काळात प्रवाशांना तिकिट मिळण्याचा ताण कमी होऊन प्रवास अधिक सुकर होण्याची अपेक्षा आहे.







