विशाल शिंदे

राजगड: राजगड तालुक्यातील कोदवडी गावच्या स्टॉप परिसरात असलेल्या हॉटेल श्रीनाथ येथे मध्यरात्रीच्या सुमारास थरारक हल्ल्याची घटना घडली असून, जुन्या भांडणाचा राग मनात धरून काही स्थानिक तरुणांनी हॉटेलमध्ये घुसून हवेत गोळीबार करत दहशत माजविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात ४ ते ५ तरुणांनी हॉटेलमध्ये प्रवेश करत त्यांच्या जवळील कोयता या धारदार शस्त्राने हॉटेल मालक आणि कामगारांवर हल्ला करत मारहाण केली. तसेच फायर आर्म अर्थात बंदुकीचा वापर करत हवेत गोळीबार करण्यात आला. आरोपींनी हॉटेलमधील साहित्याची तोडफोड करत परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण केले.
या हल्ल्यात हॉटेल मालक आणि एक कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नसरापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
जुन्या वादातूनच हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून, आरोपींनी जिवे मारण्याच्या उद्देशाने दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. स्थानिक आरोपींकडूनच हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाचा तपास वेल्हे पोलीस करत असून आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), पुणे आणि वेल्हे पोलीसांचे विशेष पथक रवाना करण्यात आले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.







