पिंपरी : शेअर बाजारात गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर टोळीविरुद्ध पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या संघटित गुन्हेगारी टोळीतील नऊ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. या टोळीत उच्चशिक्षित व्यक्तींचाही समावेश असल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सायबर गुन्हेगारांविरुद्ध मकोका लावण्याची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची यंदाची ही दुसरी मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात आले. पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात एका ज्येष्ठ नागरिकाची बनावट ट्रेडिंग ॲपच्या माध्यमातून 86 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत पोलिसांनी फसवणुकीच्या रकमेपैकी 28 लाख रुपये गोठवले. न्यायालयाच्या आदेशानंतर ही रक्कम फिर्यादीला परत मिळवून देण्यात आली.
तपासादरम्यान पोलिसांनी पुणे, लातूर, अहिल्यानगर, नवी मुंबई आणि हैदराबाद येथे कारवाई करत सहा जणांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये इंजिनिअर, चार्टर्ड अकाउंटंट (सीए) आणि बीएचएमएस पदवीधारकांचा समावेश आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

कंबोडियातील सूत्रधाराशी संपर्क

पोलिसांच्या माहितीनुसार, ही टोळी कंबोडियातील मुख्य सूत्रधाराच्या संपर्कात राहून सायबर फसवणुकीचे प्रकार करत होती. फसवणुकीतून मिळालेली रक्कम यूएसडीटीसारख्या आभासी चलनात (क्रिप्टोकरन्सी) रूपांतरित केली जात असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. या टोळीशी संबंधित आरोपींविरुद्ध पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि गुजरात येथेही खंडणी, दरोडा, अमली पदार्थांची तस्करी आणि फसवणुकीसारखे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
संघटित गुन्हेगारीविरोधात कठोर पाऊल
या प्रकरणातील गुन्हेगारीचे स्वरूप आणि आरोपींचे संघटित जाळे लक्षात घेऊन अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांनी गुन्ह्यात मकोका अंतर्गत कलमे समाविष्ट करण्याचे आदेश दिले. सहायक पोलीस आयुक्त रोहिणी बनकर यांच्या नेतृत्वाखालील पथक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.







