मावळ: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक गावातून एक अत्यंत संतापजनक आणि चीड आणणारी घटना समोर आली आहे. अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीला आईस्क्रीमचे आमिष दाखवून एका ५१ वर्षांच्या नराधमाने तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

मंगळवारी (१ सप्टेंबर) सकाळी ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास आरोपी बाळू नामदेव असवले (वय ५१, रा. टाकवे बुद्रुक) याने या चिमुकलीला गाठले आरोपीने तिला दुकानातून आईस्क्रीम घेऊन देण्याचे आमिष दाखवले आणि तिच्यावर अत्याचार केले. नराधमाच्या तावडीतून सुटल्यानंतर चिमुकलीने घरी जाऊन घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला

मुलीचे बोलणे ऐकून हादरलेल्या आईने गुरुवारी (३ सप्टेंबर) तात्काळ वडगाव मावळ पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरुद्ध फिर्याद दिली. आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्परता दाखवत ५१ वर्षीय आरोपी बाळू असवले याला अटक केली.

आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक शंकर पाटील, सहायक निरीक्षक अण्णासाहेब गाडेकर आणि उपनिरीक्षक माहेश्वरी पाटील या प्रकरणाचा पुढील कसून तपास करत आहेत.







