पुणे, ता. 4 : शिरूर येथील उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील चुकीचे व नियमबाह्य मोजणी नकाशे, तसेच कथित बनावट अथवा सदोष मोजणी नकाशांबाबत करण्यात आलेल्या तक्रारींची चौकशी करून दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश पुणे प्रदेश भूमि अभिलेखचे उपसंचालक विष्णू शिंदे यांनी गुरुवारी (ता.3) दिले आहेत.

बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने फिरोज भाई सय्यद यांनी 18 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, पुणे यांच्याकडे तक्रार अर्ज सादर केला होता. हा अर्ज 1 सप्टेंबर रोजी संबंधित कार्यालयास प्राप्त झाला. तक्रारीची प्रत भूमी अभिलेख आयुक्त व संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनाही देण्यात आली होती.

तक्रार अर्जात शिरूर कार्यालयातील मोजणी प्रकरणे, कार्यालयीन कर्मचारी, खासगी व्यक्ती, ड्रोन सर्वेक्षण आदींबाबत एक ते दहा मुद्द्यांवर गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. मोजणी नकाशांमध्ये कथित चुका व नियमबाह्य कार्यवाही झाल्याचा आरोप करत संबंधितांवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर तक्रारीतील सर्व मुद्द्यांची कायदेशीर तरतुदी, नियम व परिपत्रकांचा विचार करून नियमानुसार तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चौकशीअंती संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांची जबाबदारी निश्चित करून नियमांतर्गत कारवाई करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच, तक्रारीचे निरसन करून अर्जदाराला सविस्तर उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल पुराव्याच्या कागदपत्रांसह एक महिन्याच्या आत पुणे प्रदेश भूमि अभिलेख उपसंचालक कार्यालयास सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
तक्रारीतील मुद्द्यांची चौकशी
1)चुकीचे व नियमबाह्य मोजणी नकाशे
2)कथित बनावट अथवा सदोष मोजणी नकाशे
3)मोजणी प्रकरणांबाबतचे आक्षेप
4)कार्यालयीन कर्मचारी व खासगी व्यक्तींच्या भूमिकेबाबत तक्रारी
5)ड्रोन सर्वेक्षणासंदर्भातील मुद्दे
6) चौकशीचा अहवाल सादर झाल्यानंतरच तक्रारीतील आरोपांबाबत वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.






