बारामती, ता. 04 : दूध डेअरी व्यवसायासाठी हातउसने घेतलेल्या 15 लाख रुपयांची परतफेड करण्यासाठी दिलेले दोन धनादेश न वटल्याने कण्हेरी येथील संतोष सोमनाथ करे यांना न्यायालयाने सहा महिन्यांचा कारावास आणि तब्बल 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला. दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) प्रीतेश भंडारी यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

कण्हेरी येथील शंकर विठ्ठल काळे यांनी संतोष करे यांना दूध डेअरी व्यवसायासाठी 15 लाख रुपये हातउसने दिले होते. या व्यवहाराबाबत दोघांमध्ये करारनामा झाला होता. त्यानुसार एका वर्षाच्या आत रक्कम परत करण्याचे करे यांनी मान्य केले होते.

मुदत पूर्ण झाल्यानंतर रकमेच्या परतफेडीसाठी करे यांनी काळे यांना दोन धनादेश दिले. काळे यांनी ते बँकेत जमा केले असता दोन्ही धनादेश न वटता परत आले. त्यामुळे काळे यांनी न्यायालयात धाव घेत चेक बाउन्सप्रकरणी खटला दाखल केला. खटल्यातील सुनावणी आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने संतोष करे यांना सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यासोबतच 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम 30 दिवसांच्या आत भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, दंडाच्या रकमेतून 29 लाख 90 हजार रुपये फिर्यादी शंकर काळे यांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचे, तर उर्वरित 10 हजार रुपये न्यायालयात दंड म्हणून जमा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. फिर्यादी शंकर काळे यांच्या वतीने ॲड. राजेंद्र काळे यांनी कामकाज पाहिले. त्यांना ॲड. आदेश काळे, ॲड. प्रगती माळवे, ॲड. तुषार कवडे, ॲड. मनीष जाधव, ॲड. संतोष भोईटे आणि ॲड. आकाश साबळे यांनी सहकार्य केले.






