छत्रपती संभाजीनगर: कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आपल्या पक्षाची पुढील दिशा स्पष्ट केली आहे. देशभरातून छत्रपती संभाजीनगर येथे जमलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून 2 दिवसांचा ‘कॉक्रोच कॉन्क्लेव्ह’ आयोजित करण्यात आला आहे. या बैठकीत पक्षाची पुढील रणनीती आणि भविष्यातील रोडमॅप निश्चित केला जाणार आहे.

नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारविरोधात देशभर आंदोलन करत शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे अभिजीत दिपके आता नव्या भूमिकेत दिसत आहेत. देशाला आणखी एका राजकीय पक्षाची गरज नसून, सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी दबावगटाची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दिपकेंच्या या घोषणेमुळे कॉक्रोच जनता पार्टी निवडणूक लढवणारा पक्ष नसून, जनतेच्या प्रश्नांसाठी सरकारवर दबाव निर्माण करणारी संघटना म्हणून काम करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये काही प्रमाणात दिलासा असला, तरी सत्ताधाऱ्यांसाठी ही भूमिका आव्हानात्मक ठरू शकते.

भारतात अनेक दबावगटांनी आपल्या आंदोलनांच्या माध्यमातून सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडले आहे. मराठा क्रांती मोर्चा, भारतीय किसान युनियन, संयुक्त किसान मोर्चा, भारतीय मजदूर संघ आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांसारख्या संघटनांनी विविध मुद्द्यांवर सरकारचे लक्ष वेधले आहे.
मात्र, इतिहास पाहिला तर अनेक दबावगट पुढे राजकीय पक्षांमध्ये बदलल्याची उदाहरणेही आहेत. मराठी माणसाच्या हक्कासाठी सुरू झालेली शिवसेना पुढे राजकीय पक्ष बनली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी उभारलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढे निवडणुकीच्या मैदानात उतरली. त्यामुळे आंदोलनातून सुरू झालेल्या संघटनांचा प्रवास अनेकदा राजकारणाकडे वळल्याचे दिसून येते.
सध्या अभिजीत दिपके कॉक्रोच जनता पार्टीला दबावगट म्हणून पुढे नेण्याची भूमिका घेत आहेत. मात्र, भविष्यात जनाधार वाढला आणि लोकांच्या अपेक्षा वाढल्या, तर ही संघटना राजकीय पक्षाच्या रूपात पुढे येणार नाही, याची खात्री देता येणार नाही.







