पुणे : पुणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये ‘घोरपड’ या वन्यजीवाच्या सुकवलेल्या गुप्तांगांची (अंधश्रद्धेच्या बाजारात ‘हत्ता जोडी’ म्हणून विकले जाते) तस्करी करणाऱ्या एका आरोपीला वनविभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. मल्हार लाला लोखंडे असे वनगुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून गुन्ह्याचा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्टेशन परिसरात वन्यप्राण्यांच्या अवयवांची खरेदी-विक्री होणार असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती. माहिती मिळताच वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियोजित पथकाने रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचला. आरोपी मल्हार लोखंडे हा संशयास्पद रितीने त्या ठिकाणी आला असता, पथकाने झडती घेऊन त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत वन्यजीव कायद्यानुसार अत्यंत प्रतिबंधित असलेल्या घोरपडीचे सुकवलेले गुप्तांग (हत्ता जोडी) आढळून आले.

वनविभागाने आरोपी मल्हार लोखंडे याच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या विविध कलमांन्वये अधिकृत वनगुन्हा नोंदवला आहे. आरोपीला अटक करून माननीय न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी एक दिवसाची वनकोठडी मंजूर केली आहे. या तस्करीमागे आणखी कोणती मोठी टोळी सक्रिय आहे का? याचा पुढील कडक तपास वनविभाग करत आहे.
दरम्यान, वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ च्या अनुसूची क्र. ०१ मधील विनिर्दिष्ट केलेल्या वन्यप्राण्यांशी संबंधित गुन्ह्यांसाठी ३ वर्षांपेक्षा कमी नसणाऱ्या, परंतु तब्बल 7 वर्षांपर्यंतच्या कडक कारावासाचीआणि २५ हजार रुपयांपेक्षा कमी नसणाऱ्या कडक दंडाची तरतूद आहे.
सदर कारवाईत आशिष ठाकरे (वनसंरक्षक प्रा., पुणे), अभिजीत वायकोस (उपवनसंरक्षक, पुणे) आणि विशाल चव्हाण (सहाय्यक वनसंरक्षक, पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकिशोर पाटील, वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर, वनरक्षक अनिल राठोड, अंकुश कचरे, मधुकर गोडगे, श्रीराम जगताप आणि ओंकार गुंड या वनकर्मचाऱ्यांचा समावेश होता.






