पुणे: जून महिना संपत आला तरी पावसाने हुलकावणी दिल्याने संपूर्ण राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला असून, पावसाने राज्यात सर्वत्र हजेरी लावली आहे. पर्जन्यवृष्टीसाठी शिवभक्त आणि नागरिकांनी अनेक ठिकाणी विशेष धार्मिक विधी करून निसर्गाला साकडे घातले होते. दरम्यान, देवाने तथास्तु म्हंटले असल्याचे चित्र दिसून येत आहे. 21 जून रोजी झालेल्या या पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, शेतीकामांनाही वेग आला आहे.

पुणे शहरात आज दुपारनंतर आकाशात ढग दाटून आले आणि त्यानंतर पावसाने जोरदार सुरुवात केली. हडपसर, कोथरूड, कात्रज आणि सिंहगड रोड यांसारख्या महत्त्वाच्या भागात पावसाचा जोर अधिक दिसून आला. पिंपरी-चिंचवडमध्येही पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे. साताऱ्याच्या पश्चिम भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार एन्ट्री केली, ज्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. पेरणीपूर्व कामांसाठी सज्ज असलेल्या बळीराजाला या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

दुसरीकडे, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये तब्बल १० ते १५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे पुनरागमन झाले, ज्यामुळे भात पिकांना संजीवनी मिळाली आहे. दक्षिण रायगडमधील महाडमध्येही पावसाने जोरदार आगमन केल्याने वातावरणातील उष्णता पूर्णपणे शमली आहे. मुंबईतही अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप पाहायला मिळाली.
पावसाच्या दडीमुळे निर्माण झालेले पाणीटंचाईचे संकट आता टळण्याची चिन्हे आहेत. मान्सूनच्या पहिल्या पावसामुळे संपूर्ण राज्याच्या तापमानात घट होऊन वातावरणात गारवा पसरला आहे.






