पुणे: पुण्यातील अल्पवयीन मुलांमध्ये वाढत चाललेली गुन्हेगारी सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. याचाच प्रत्यय देहूरोड येथील मरिमाता चौकात नुकत्याच घडलेल्या एका धक्कादायक घटनेतून आला. जुन्या वैमनस्यातून दोन गटांत झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक गँगवॉरमध्ये झाले. या वादातून 3 अल्पवयीन मुलांनी मिळून एका अल्पवयीन मुलावर धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला चढवला.

हा हल्ला इतका भीषण होता की, पीडित मुलाने स्वतःचा बचाव करण्यासाठी हात पुढे केला असता, कोयत्याच्या वारामुळे त्याचे हाताचे एक बोट तुटून वेगळे झाले. मरिमाता चौकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. हल्लेखोरांचा प्रयत्न पीडित मुलाच्या डोक्यावर आणि मानेवर वार करण्याचा होता, परंतु पीडित मुलाने प्रतिकार केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

हा थरार पाहून तिथे उपस्थित नागरिक सुरुवातीला काही काळ घाबरले होते. मात्र, जिवाची पर्वा न करता काही नागरिकांनी हल्लेखोरांच्या दिशेने धाव घेतली आणि 3 पैकी एका अल्पवयीन हल्लेखोराला जागीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. उर्वरित 2 साथीदार घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, फरार झालेल्या इतर 2 आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.






