Maharashtra Politics: दौंड, ता. 24 : “राज्यात तीन-तीन वेळा मंत्रिपद हुकण्याची वेळ आलेला एकमेव आमदार मी असेन; पण तरीही माझ्या मनात नाराजी नाही. सर्व निर्णय मनासारखे होत नसतात,” अशी खंत विधिमंडळ सार्वजनिक उपक्रम समितीचे प्रमुख तथा भाजप आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केली.

हेही वाचा- पुण्यात कोयता गँगच्या नांग्या ठेचल्या! पोलिसांनी गुन्हेगारांना पडद्याआड नेलं अन् असं काही केलं की…
दौंड नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौकात नागरिक हित संरक्षण मंडळ पॅनेल आयोजित सभेत ते बोलत होते. पॅनेलचे प्रमुख व माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मोनाली वीर तसेच इतर उमेदवार यावेळी उपस्थित होते.
आमदार राहुल कुल म्हणाले, “2014 मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाकडून, तर 2019 व 2014 मध्ये भाजप उमेदवार म्हणून निवडून आलो. तिन्ही वेळा पक्षप्रमुखांनी मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले; मात्र ते मिळाले नाही. माझ्यासारखी वेळ सभागृहात कदाचित कोणावर आली नसेल.” “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारसंघासाठी दिलेल्या निधीबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. माझे मंत्रिपद हुकल्याची जाणीव सर्व मंत्र्यांना असल्याने ते मला अधिकचा निधी देतात.”
दरम्यान, “दौंड मागे राहिले ही सल आता दूर करायची आहे. अनुशेष मोठा आहे. पुढील तीन वर्षांत शहरातील प्रत्येक घरात पिण्याचे स्वच्छ पाणी पोचविणे ही माझी जबाबदारी असेल. दौंडचा कायापालट करण्यासाठी मला मताधिक्याने निवडून द्या,” असे आवाहन त्यांनी केले.
पॅनेल प्रमुख प्रेमसुख कटारिया म्हणाले, “आमदार राहुल कुल यांनी दौंड शहरासाठी जेवढा निधी दिला तेवढा निधी आजपर्यंत कोणत्याही आमदारांनी दिलेला नाही. आम्हाला कोणाशीही स्पर्धा करायची नाही. दूरदृष्टी ठेवून दौंडला राज्याच्या नकाशावर आणण्यासाठी आम्ही केलेल्या कामांवर विश्वास ठेवत मतदान करण्याचे आवाहन पॅनेलप्रमुख प्रेमसुख कटारिया यांनी केले.”





