पुणे : देशात आणि राज्यात मॉन्सूनचा प्रवास वेगाने सुरू असून, हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक भागांसाठी महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.राज्यातील काही भागांमध्ये आज अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः पालघर आणि पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर ढगफुटीसदृश किंवा अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. यामुळे या भागांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.

मॉन्सून सक्रिय होत असल्याने कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे. आज पालघर ते पुण्याच्या घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, घाटमाथा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

दुसरीकडे, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी या किनारपट्टीच्या भागांसह सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा पॅटर्न थोडा वेगळा असेल. नागपूर, भंडारा, चंद्रपूर, अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांशिवाय, महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्येही विजांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, त्यामुळे तिथे यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे.
दुसरीकडे मोसमी वारे देशाच्या इतर भागांमध्ये वेगाने पुढे सरकत आहेत. हवामान शास्त्रज्ञांच्या मते, पुढील 2 दिवसांत राजधानी दिल्ली आणि राजस्थानसह देशातील उर्वरित राज्यांमध्येही मॉन्सून दाखल होण्यासाठी परिस्थिती अत्यंत अनुकूल आहे.







