पुणे: विवाहविषयक संकेतस्थळावर ओळख झालेल्या एका तरुणाने पुण्यातील तरुणीची तब्बल 27 लाख 94 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. विवाहासाठी इच्छुक असल्याचे सांगत आरोपीने आधी तरुणीशी जवळीक निर्माण केली. त्यानंतर परदेशातील नोकरी आणि बँक खाते गोठल्याचे कारण सांगून तिच्याकडून टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम घेतली.

या प्रकरणी उच्चशिक्षित तरुणीने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीने विवाहासाठी एका ऑनलाइन संकेतस्थळावर आपली माहिती नोंदवली होती. याच माध्यमातून आरोपीने तिच्याशी संपर्क साधला. आपण लग्न करण्यास इच्छुक असल्याचे सांगून त्याने नियमितपणे फोन आणि ऑनलाइन माध्यमातून तिच्याशी संवाद सुरू ठेवला.

काही काळ संवाद झाल्यानंतर आरोपीने आपण तुर्कीमधील एका कंपनीत मोठ्या पदावर काम करत असल्याचे सांगितले. आपल्या या कथित नोकरीची माहिती देत त्याने तरुणीचा विश्वास मिळवला. लग्नाचे आश्वासन दिल्याने तरुणीचाही त्याच्यावर विश्वास बसला.

त्यानंतर आरोपीने त्याचे तुर्कीतील बँक खाते काही कारणामुळे बंद किंवा गोठवण्यात आल्याचे सांगितले. पैशांची तातडीची गरज असल्याचे सांगून त्याने तरुणीकडे आर्थिक मदतीची मागणी केली. आरोपीच्या सांगण्यावर विश्वास ठेवून तरुणीने गेल्या 5 ते 6 महिन्यांत वेगवेगळ्या वेळी त्याच्या बँक खात्यावर पैसे पाठवले. मात्र, पैसे मिळाल्यानंतर त्याने अचानक आपला मोबाइल क्रमांक बंद केला. त्यानंतर तरुणीने अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
वारंवार प्रयत्न करूनही आरोपीशी संपर्क न झाल्याने तरुणीला संशय आला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेतली. दरम्यान, या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.







