लोणीकंद, ता. 15 : ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी घेतलेल्या (Lonikand News) गाड्यांचे बँक हप्ते भरण्याच्या अटीवर गाड्या ताब्यात घेऊन, त्या मालकाच्या संमतीविना परस्पर विकून 22 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी डोंगरगाव (ता. हवेली) येथील एकावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश उर्फ उत्तम उर्फ बापू मुरलीधर गायकवाड (रा. माळवाडी, डोंगरगाव, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पांडुरंग भाऊसाहेब पायगुडे (वय-50, रा. वाडेबोल्हाई, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पांडुरंग पायगुडे यांचा 2001 पासून ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांच्या मालकीच्या टाटा 1613 मॉडेलच्या चार गाड्या आहेत. मार्च 2022 च्या सुमारास गाड्यांना पुरेसा धंदा मिळत नसल्याने, ओळखीचे सुरेश गायकवाड यांनी या गाड्या धंद्यासाठी मागितल्या. पायगुडे यांनी “गाड्यांचे फायनान्स कंपनीचे मासिक हप्ते गाडीचे लोन संपेपर्यंत भरावेत,” या अटीवर तीन गाड्या गायकवाडच्या ताब्यात दिल्या.
यामध्ये MH12 HD 9809 (चोलामंडलम फायनान्स – किंमत 11 लाख), MH 12 KP 7974 (मन्नपुरम फायनान्स – किंमत 6 लाख) व MH 12 VT 9809 (HDFC बँक – किंमत 5 लाख), या तीन गाड्या दिल्या होत्या. मे 2023 पर्यंत गायकवाडने धंदा चांगला सुरू असल्याचे आणि हप्ते भरत असल्याचे सांगून पायगुडे यांचा विश्वास संपादन केला. मात्र, जून 2023 मध्ये गाड्या गायकवाडच्या ताब्यात दिसून आल्या नाहीत. पायगुडे यांनी विचारणा केली असता त्याने गाड्या धंद्यासाठी बाहेर गेल्याचे खोटे कारण सांगितले.
संशय आल्याने पायगुडे यांनी डोंगरगाव परिसरात चौकशी केली असता, गायकवाडने या तिन्ही गाड्या त्यांच्या संमतीविना परस्पर कोणाला तरी विकल्याचे समजले. गाड्या परस्पर विकल्याचे उघड झाल्यावर सुरेश गायकवाडने “घरगुती अडचणीमुळे गाड्या विकल्या, मी तुमचे पैसे देतो,” असे आश्वासन देऊन तक्रार न करण्यास विनंती केली. मात्र, अनेक महिने उलटूनही गाड्या किंवा त्याचे पैसे न मिळाल्याने पायगुडे यांनी अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
दरम्यान, सुरेश गायकवाड याने संगनमताने पायगुडे यांचा विश्वासघात करून 22 लाख रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.







