लोणी काळभोर, ता. 13: दारूच्या नशेत पत्नी व तीन मुलींना मारहाण, अश्लील शिवीगाळ आणि चारित्र्यावर संशय घेत महिला सुरक्षा रक्षकाचा तब्बल दहा वर्षे शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पांढरी मळा परिसरात घडली आहे. याप्रकरणी एकावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Loni Kalbhor Crime)

अशोक देवराव वानखेडे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 36 वर्षीय विवाहित महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या लोणी काळभोर परिसरात सुरक्षा कर्मचारी म्हणून कार्यरत असून, पती अशोक वानखेडे हे चालक म्हणून काम करतात. विवाहानंतर सुरुवातीला संसार सुरळीत होता; मात्र नंतर किरकोळ कारणांवरून व चारित्र्यावर संशय घेऊन आरोपी अशोक वानखेडे यांनी वारंवार मारहाण, शिवीगाळ व दमदाटी सुरू केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
पीडितेच्या म्हणण्यानुसार, पती अशोक वानखेडे हा रोज दारू पिऊन घरी यायचा. पिडीता व तीन अल्पवयीन मुलींना अश्लील शिवीगाळ करून मारहाण करतो. यापूर्वीही पिडीता यांना पोलिसांत तक्रार दिली होती. नणंद व नातेवाईकांनी अशोक वानखेडे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र वागणुकीत कोणताही बदल झाला नाही.
दरम्यान, गेल्या दहा वर्षांत सातत्याने शारीरिक मारहाण, मानसिक छळ आणि चारित्र्यावर संशय घेत त्रास दिला आहे. या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पिडीतेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी अशोक वानखेडे याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 115 (2), 351 (1), 351 (2), 352 व 85 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी करत आहेत.







